बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक संपन्न

📍 अहिल्यानगर | दि. १५

बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर केवळ परवाने निलंबित करण्यापुरती कारवाई न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच खतांचा काळाबाजार, सक्तीची जोडविक्री आणि जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या पीक विमा कंपन्यांवरही गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे पाटील, विक्रमसिंह पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, खरीप हंगामात खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी काटेकोर नियोजन आवश्यक आहे. जिल्ह्यात पुरेसा खतसाठा उपलब्ध असून पारंपरिक युरिया आणि डीएपीला पर्याय म्हणून ‘नॅनो युरिया’ व ‘नॅनो डीएपी’च्या वापराला प्रोत्साहन द्यावे. खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ‘क्यूआर’ प्रणाली व इलेक्ट्रॉनिक विक्री यंत्रणा प्रभावीपणे राबवावी, तसेच सर्व कृषी सेवा केंद्रांवर खतांचे दर व उपलब्ध साठा दर्शविणारे फलक लावणे बंधनकारक करावे.

सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा परिषदेमार्फत सन्मान करण्याचे निर्देश देत नैसर्गिक शेतीकडे शेतकरी प्रेरित व्हावेत, असे त्यांनी सांगितले.

राज्याबाहेरून येणाऱ्या बोगस बियाण्यांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी सीमावर्ती भागात पोलिसांच्या मदतीने तपासणी नाके उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कापूस, सोयाबीन व रब्बी ज्वारी बियाण्यांमधील फसवणुकीची गंभीर दखल घेत अनधिकृत विक्रेत्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आतापर्यंत ११ हजार तपासण्या करून १०३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात २ पोलीस केसेस आणि १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात ५ हजार ४०० मेट्रिक टन खताचा राखीव साठा तयार करण्यात आला असून त्यापैकी ७५० मेट्रिक टन साठा सध्या उपलब्ध आहे. ‘महा-विस्तार’ ॲपवर ३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून जिल्ह्यात १२ हजार ५०० एकर क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचे प्रयोग सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सादरीकरण केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माहितीपुस्तिकेचे व संतुलित खत वापर जनजागृती अभियान पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *