संगमनेर तालुका टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

संगमनेर दि . १७ : संगमनेर तालुक्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देऊन गावे व वाड्यांमध्ये विनाविलंब पाणीपुरवठा करावा. प्रशासकीय कामकाजात दिरंगाई अथवा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
संगमनेर येथे तालुकास्तरीय पाणीटंचाई व चाराटंचाई निवारण उपाययोजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सध्या तालुक्यात १९ टँकरद्वारे २५ गावे व ५४ वाड्यांना पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती देत पालकमंत्री म्हणाले की, टँकरचे वेळापत्रक निश्चित करून ग्रामस्थांना आगाऊ माहिती द्यावी. टँकर गावात आल्यानंतर ग्रामसेवक व तलाठी यांची उपस्थिती बंधनकारक राहील. आरोग्याच्या दृष्टीने टँकरचे पाणी थेट विहिरीत न सोडता प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये साठवून त्यातून वितरण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
नद्यांचे वाढते प्रदूषण आणि पिण्याच्या पाण्याची खालावलेली गुणवत्ता चिंताजनक असल्याचे सांगत, कालवे व नद्यांमध्ये सांडपाणी सोडणाऱ्या नगरपालिका आणि कारखान्यांवर कठोर कारवाईचे निर्देश त्यांनी दिले. सांडपाणी प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पिण्याच्या पाण्याचे शंभर टक्के नमुने तपासून नोंद ठेवण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या.
टंचाईच्या काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निर्देश देताना, रोहित्रांवरील अतिरिक्त भार टाळण्यासाठी अनधिकृत वीजजोडण्या तोडण्याची मोहीम राबवावी, असे त्यांनी सांगितले. वादळामुळे पडलेले विजेचे खांब तत्काळ उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
जलजीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देत, कामे उपकंत्राटदारांना देणाऱ्या मुख्य ठेकेदारांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अनधिकृत जलवाहिन्यांमधून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कालव्यातून संगमनेरपर्यंत स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी तसेच तळेगाव साठवण तलावापर्यंत जलवाहिनी नेण्याबाबत सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जलशुद्धीकरण यंत्रणा उभारण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामसेवक, तलाठी व शासकीय अधिकारी यांनी मुख्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात, असे निर्देश देण्यात आले. बैठकीस अनुपस्थित राहणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारणे दाखवा नोटीस बजावून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीचे प्रास्ताविक आमदार अमोल खताळ यांनी केले.

