
📍 संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील तिगाव परिसरात खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे तिगाव गावावर शोककळा पसरली असून तिगाव ग्रामस्थांसह तळेगाव गटातील नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
परिसरात सुरू असलेल्या खाणी व क्रेशरमुळे मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाचे पाणी साचून हे खड्डे अक्षरशः मृत्यूचे सापळे बनले आहेत. सुरक्षा उपाययोजनांचा पूर्ण अभाव, कोणतेही सूचना फलक नाहीत, संरक्षण भिंती नाहीत, तर दुसरीकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष यामुळे निष्पाप जीव जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर आता संतप्त ग्रामस्थांनी थेट प्रशासन, महसूल विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ व लोकप्रतिनिधींनाच जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. “वारंवार तक्रारी करूनही कारवाई का होत नाही?”, “खाण व क्रेशर मालकांना नेमका वरदहस्त कुणाचा?”, “सामान्य नागरिकांच्या जीवाची किंमत नाही का?” असे तीव्र सवाल उपस्थित केले जात आहेत.

तिगाव व तळेगाव गटातील ग्रामस्थांनी एकत्र येत बेकायदेशीर खाण व क्रेशरविरोधात कठोर भूमिका घेतली असून, तात्काळ कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. परिसरातील अनेक गावांमध्ये खाण व क्रेशरमुळे धूळप्रदूषण, रस्त्यांची दुरवस्था, पाण्याची समस्या आणि जीवितास धोका वाढत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. मात्र प्रशासन केवळ कागदोपत्री कारवाई करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
याबाबत प्रतिक्रिया देताना शरद गोर्डे यांनी संतप्त भावना व्यक्त करत म्हटले की,
“अजून किती निष्पापांचे बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार? दोन सख्या भावांचा मृत्यू अत्यंत वेदनादायी असून हा केवळ अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा बळी आहे. परिसरातील बेकायदेशीर खाणी आणि क्रेशरमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी गप्प का आहेत? खाण व क्रेशर मालकांना वरदहस्त कुणाचा आहे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. अन्यथा तळेगाव गटाच्या वतीने तीव्र व उग्र आंदोलन उभारले जाईल.”
⚠️ ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या :
▪️ बेकायदेशीर खाणी व क्रेशर तात्काळ बंद करावेत
▪️ संबंधित अधिकारी व मालकांवर कठोर कारवाई करावी
▪️ दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
▪️ मृतांच्या कुटुंबीयांना मोठी आर्थिक मदत जाहीर करावी
▪️ खाणी परिसरात सुरक्षा उपाययोजना सक्तीच्या कराव्यात
▪️ तालुक्यातील सर्व खाणींची उच्चस्तरीय चौकशी करावी

दोन निष्पाप भावांचा मृत्यू हा संपूर्ण संगमनेर तालुक्यासाठी धक्कादायक असून आता तरी प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे.
✍️ ज्ञानगंगा न्यूज
🌐 Dnyangangaa.com
