अन्न व औषध प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

अन्न व औषध प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, क्लाऊड किचनसह सर्व अन्न व्यवसायांवर राज्यव्यापी विशेष तपासणी; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

FSSAI परवाना बंधनकारक; स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका

मुंबई | प्रतिनिधी

अन्न व औषध प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील अन्न व्यवसायांमध्ये स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि ग्राहकांच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत कडक अंमलबजावणीचे आदेश जारी केले आहेत. राज्यातील सर्व विभागीय सहआयुक्त, जिल्हा अन्न सुरक्षा अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या आदेशानुसार राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, कॅफे, बेकरी, स्वीट शॉप, क्लाऊड किचन, डार्क किचन, केटरिंग सेवा, फूड ट्रक तसेच ऑनलाइन फूड डिलिव्हरीशी संबंधित सर्व अन्न व्यवसाय विशेष तपासणीच्या कक्षेत आणण्यात आले आहेत. ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

FSSAI परवाना अनिवार्य

अन्न व औषध प्रशासन विभागाने सर्व अन्न व्यवसायांसाठी वैध FSSAI नोंदणी अथवा परवाना अनिवार्य केला आहे. परवान्याशिवाय अन्न व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असून तपासणीदरम्यान परवाना, नोंदी व इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.

स्वच्छता आणि अन्न सुरक्षेचे कडक निकष

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढील बाबींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • ग्राहकांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे.
  • स्वयंपाकघर, भोजनगृह व स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवणे.
  • नियमित पेस्ट कंट्रोल करणे.
  • वारंवार वापरलेले खाद्यतेल वापरण्यास बंदी.
  • कच्चे व शिजवलेले अन्न स्वतंत्र ठेवणे.
  • शाकाहारी व मांसाहारी पदार्थ वेगळे साठवणे.
  • कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करणे.
  • स्वच्छ गणवेश, हेडकॅप व हातमोजे वापरणे.
  • मेनूमध्ये कॅलरी, पोषणमूल्य आणि अॅलर्जनची माहिती नमूद करणे.

नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

अन्न व औषध प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे की, अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणेत येईल

राज्यभर विशेष तपासणी मोहीम

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकांकडून राज्यभर अचानक तपासण्या केल्या जाणार आहेत. अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, FSSAI परवाना, खाद्यतेलाचा वापर, अन्न साठवणूक, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आणि ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची तपासणी केली जाईल. नियमांचे उल्लंघन आढळल्यास परवाना निलंबित करणे, अन्नसाठा जप्त करणे, दंडात्मक कारवाई आणि आवश्यकतेनुसार न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

नागरिकांनी तक्रारी नोंदवाव्यात

निकृष्ट, भेसळयुक्त किंवा अस्वच्छ अन्नाबाबत नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात, FSSAI हेल्पलाईन, FoSCoS/Food Safety Connect App किंवा संबंधित अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागाने केले आहे.

ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड नाही

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे की, ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही अन्न व्यवसायाला माफी दिली जाणार नाही. अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन न करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. राज्यातील सर्व अन्न व्यवसायांनी नियमांचे पालन करून सुरक्षित व दर्जेदार अन्न पुरवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *