कुंभच्या यशस्वी आयोजनासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १३ : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भव्य आणि दिव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. प्रति आखाडा ५ कोटी रुपये, छोट्या संस्थानांसाठी प्रत्येकी १५ लाख रुपये तसेच आखाड्यांच्या वीज बिलाची प्राधिकरणामार्फत भरपाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादाजी भुसे, डॉ. उदय सामंत, शिवेंद्रसिंह राजे भोसले आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्रासाठी सेवेचा आदर्श निर्माण करण्याची मोठी संधी आहे. जगभरातून येणाऱ्या साधू, महंत आणि भाविकांच्या सेवेसाठी शासन कटिबद्ध असून, त्यांच्या मार्गदर्शनातून कुंभमेळ्याचे नियोजन करण्यात येत आहे. आखाड्यांच्या जमिनी शासकीय कामासाठी अधिग्रहित झाल्यास संबंधित आखाड्यांना मोबदला किंवा पर्यायी जमीन दिली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
पुढील १२ वर्षांचा विचार करून नियोजन
यंदाचे नियोजन केवळ आगामी कुंभमेळ्यासाठी नसून पुढील १२ वर्षांनंतरच्या कुंभमेळ्याचाही विचार करून स्थायी स्वरूपाची विकासकामे करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात अध्यात्मपूरक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जात असून, त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भव्य कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे.
रामकाल पथ, कुंड, मंदिर आणि गुफांच्या जीर्णोद्धारासह गोदावरी नदी स्वच्छतेवरही मोठ्या प्रमाणावर काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
सुरक्षेबाबत तडजोड नाही : एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुंभमेळ्याच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. भाविकांची सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन सेवा यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सध्या कुंभमेळ्यासाठी ३७७ एकर जमीन आरक्षित करण्यात आली असून, आखाड्यांच्या अतिरिक्त जमिनीच्या मागणीबाबत शासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वर दर्शन पथ प्रकल्पाला गती
बैठकीत त्र्यंबकेश्वर दर्शन पथ प्रकल्पाचे ई-भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पासाठी एकूण ₹६६५ कोटी खर्च अपेक्षित असून, पहिल्या टप्प्यासाठी ₹२७५ कोटी आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ₹३९० कोटी खर्च होणार आहे.
या प्रकल्पात ९ हजार भाविक क्षमतेचे ‘शिव दर्शन संकुल’, वातानुकूलित हॉल, एलईडी स्क्रीन, एआय आधारित गर्दी व्यवस्थापन आणि ५ मिनिटांत आपत्कालीन निर्गमन व्यवस्था असणार आहे. पारंपारिक मराठा स्थापत्यशैलीतील काळ्या पाषाणातील बांधकामामुळे प्रकल्पाला धार्मिक आणि ऐतिहासिक स्वरूप लाभणार आहे.
शहरातील वाहतूक कोंडीत ८० टक्के घट होण्यासह स्थानिक विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
