पालकमंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली?
१ जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा; मध्यरात्रीच्या ब्लास्टिंगने ग्रामस्थ दहशतीत

📍वडझरी, ता. संगमनेर
संगमनेर तालुक्यातील वडझरी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर स्टोन क्रेशर आणि खाणकामाविरोधात ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देत तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. वारंवार तक्रारी, आंदोलनाचे इशारे आणि पालकमंत्र्यांच्या स्पष्ट सूचनांनंतरही संबंधित अधिकारी व प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित स्टोन क्रेशर आणि खाणकाम नियमबाह्य पद्धतीने सुरू असून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केले जात आहे. विशेषतः मध्यरात्री होत असलेल्या बोअर ब्लास्टिंगमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या स्फोटांच्या आवाजामुळे जनावरे घाबरत असून लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सततच्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना तडे गेल्याची तक्रार असून धूळप्रदूषणामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. गावपातळीवर घर, गाय-गोठे, विहीर, बोअर आदींचे रीतसर पंचनामे करण्यात आले असल्याचे सांगितले जात असले तरी वरिष्ठ पातळीवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नसल्याने ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. “यामागे नेमके कोणाचे पाठबळ आहे?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
पालकमंत्र्यांनी स्पष्ट सूचना देऊनही अधिकारी खाण व क्रेशर मालकांवर कारवाई करत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रस्त्यांची दुरवस्था, रात्रीची दहशत आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तात्काळ संबंधित बेकायदेशीर क्रेशर आणि खाणकाम बंद न केल्यास १ जूनपासून आमरण उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत परिसरातील वातावरण अधिक तापण्याची शक्यता असून प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
