विखे पाटलांच्या पुढाकाराने चिंचोली गुरवच्या पाण्याचा ४१ वर्षांचा प्रश्न मार्गी!

विखे पाटलांच्या पुढाकाराने चिंचोली गुरवच्या पाण्याचा ४१ वर्षांचा प्रश्न मार्गी!

उपसा सिंचन योजनेसाठी ५ कोटींचा अतिरिक्त निधी; निळवंडेच्या पाण्यामुळे पंचक्रोशीतील शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

संगमनेर, दि. २३ : तब्बल १९८५ पासून प्रलंबित असलेल्या चिंचोली गुरव आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाला आता निर्णायक वळण मिळाले आहे. राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने चिंचोली गुरव उपसा सिंचन योजनेसाठी तब्बल ५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे.

निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी विखे पाटील यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा करून योजनेला गती दिल्याचे कार्यक्रमात सांगण्यात आले. त्यामुळे दीर्घकाळ पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

चिंचोली गुरव येथे उपसा सिंचन योजनेच्या शुभारंभप्रसंगी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१९८५ पासूनचा प्रश्न; विखे पाटलांच्या पुढाकाराने निधीचा मार्ग मोकळा

चिंचोली गुरव परिसरातील सुमारे ७९५ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळावे, ही मागणी १९८५ पासून प्रलंबित होती. निळवंडे कालवे वाहते झाल्यानंतरही केवळ सुमारे ३५० हेक्टर क्षेत्राला पाण्याचा लाभ मिळत होता. उर्वरित क्षेत्रासाठी स्वतंत्र उपसा सिंचन योजनेची आवश्यकता होती.

ही बाब लक्षात घेऊन डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून योजनेला चालना देत अतिरिक्त ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

या निधीमुळे योजनेच्या कामाला आर्थिक बळ मिळाले असून, उर्वरित सुमारे ३०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

“आश्वासन नाही, प्रत्यक्ष पाणी पोहोचविण्यावर भर”

निळवंडे कालव्यांच्या कामाबाबत बोलताना विखे पाटील यांनी दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले. जिरायती भागातील शेतकऱ्यांना केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळवून देण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भोजापूर पूरचारीचा ‘दमणगंगा-वैतरणा-गोदावरी’ नदीजोड प्रकल्पात समावेश करण्यात आल्याने या भागातील पाणीप्रश्नाला आणखी मोठी दिशा मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या पाठीशी

यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवरही विखे पाटील यांनी भाष्य केले. पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी आणि चाऱ्याच्या नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, पंचायत समिती स्तरावर टँकरचे वेळापत्रक गांभीर्याने तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि वीजबिल माफीच्या निर्णयांचाही त्यांनी उल्लेख केला. चिंचोली गुरव उपसा सिंचन योजनेचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करून प्रत्यक्ष लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *