
घरांना तडे, पाणी स्रोत बंद, शेती उद्ध्वस्त; खाणमाफियांचा हैदोस
📍 वडझरी खुर्द | ता. संगमनेर
संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द परिसरात सुरू असलेल्या खाणकाम, ब्लास्टिंग व स्टोन क्रेशरच्या वाढत्या दहशतीविरोधात ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून “मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही” असा इशारा देण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने संबंधित क्रेशर चालकाला अधिकृत नोटीस बजावून नियमांचे उल्लंघन, ग्रामस्थांचे नुकसान व भीतीचे वातावरण याबाबत गंभीर आक्षेप नोंदवले असतानाही खाणकाम सुरूच असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ग्रामपंचायतीची थेट कारवाई
वडझरी खुर्द ग्रामपंचायतीने दिलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर करण्यात आलेल्या पाहणीत संबंधित स्टोन क्रेशरवर मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग होत असल्याचे आढळले. या ब्लास्टिंगमुळे गावातील घरांना व इमारतींना तडे गेले असून ग्रामस्थांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
तसेच विहिरी, बोअरवेल आणि पाणी स्रोतांवर परिणाम झाल्याने अनेक ठिकाणी पाणी कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सततच्या ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीने शासन नियम व अटींचे उल्लंघन झाल्यास संबंधित स्टोन क्रेशरला देण्यात आलेले ना हरकत प्रमाणपत्र (NOC) रद्द करण्याचा इशाराही दिला आहे.
“विकास”च्या नावाखाली गावाचा विनाश?
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, भविष्यात होणाऱ्या सुरत–हैदराबाद महामार्गाच्या मार्गात सध्या मोठ्या प्रमाणात खाणकाम सुरू आहे. गावातील ओढ्यालगतच्या गायरण जमिनीवरही अवैध उत्खनन सुरू असल्याचा आरोप होत आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे परिसर हादरत असून अनेक घरांना तडे गेले आहेत.
धुळीचे प्रदूषण, प्रचंड आवाज आणि सतत होणारे स्फोट यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लहान मुले, महिला व वृद्ध नागरिक मानसिक तणावाखाली जीवन जगत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
पाणी स्रोत बंद; शेतकरी संकटात
खाणकाम, ब्लास्टिंग आणि स्टोन क्रेशरमुळे परिसरातील अनेक विहिरी, बोअरवेल आणि नैसर्गिक पाणी स्रोत बंद पडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून शेतीचे मोठे नुकसान होत आहे. “कष्टाने उभा केलेला संसार उद्ध्वस्त होत आहे,” अशी व्यथा बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासमोर पुढील मागण्या ठामपणे मांडल्या आहेत —
🔸 सुरत–हैदराबाद महामार्गाच्या मार्गात सुरू असलेले खाणकाम तात्काळ थांबवावे.
🔸 गावातील ओढ्यालगत गायरण जमिनीवर सुरू असलेले अवैध खाणकाम बंद करून चौकशी करावी.
🔸 खाणकाम, ब्लास्टिंग व स्टोन क्रेशरमुळे बंद पडलेले पाणी स्रोत पूर्ववत सुरू करावेत.
🔸 जनावरे, कुटुंबे, शेती व ग्रामस्थांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन आर्थिक भरपाई द्यावी.
🔸 वडझरी परिसरातील बेकायदेशीर खाण व स्टोन क्रेशर तात्काळ बंद करण्यात यावेत.
🔸 घरांचे, विहिरींचे, बोअरवेलचे व गोठ्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.
🔸 पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून परवाने रद्द करावेत.
🔸 धुळ, आवाज व प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची वैद्यकीय तपासणी करावी.
🔸 ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनावर दबाव टाकणाऱ्या खाणमाफियांवर कठोर कारवाई करावी.
🔸 संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
लोकप्रतिनिधींवरही रोष
दरम्यान, परिसरातील काही आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादामुळेच खाण व क्रेशर व्यवसाय बिनधास्त सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. “विकासाच्या नावाखाली तालुका भकास होत आहे, पण लोकप्रतिनिधी गप्प का?” असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.
आंदोलनाचा इशारा
यापूर्वीही ग्रामस्थांनी प्रशासनाला अनेक निवेदने दिली होती. मात्र ठोस कारवाई होत नसल्याने आता ग्रामस्थांनी आमरण उपोषण, रास्ता रोको आणि तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
🔥 जल, जंगल, जमीन आणि ग्रामस्थांचे हक्क वाचवण्यासाठी वडझरी मध्ये आता निर्णायक लढाई सुरू झाली आहे.
