वडझरीतील आमरण उपोषणाला वाढता जनसमर्थन; प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा संताप

वडझरी बु., ता. संगमनेर | प्रतिनिधी
सुरत-हैदराबाद ग्रीनफिल्ड महामार्गाच्या मार्गात सुरू असलेल्या खाणकाम, स्टोन क्रेशर आणि ब्लास्टिंगच्या विरोधात वडझरी बु. येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला दिवसेंदिवस मोठा जनसमर्थन मिळत आहे. उपोषणस्थळी विविध सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, युवक आणि ग्रामस्थांनी भेट देत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविला.
गेल्या अनेक महिन्यांपासून खाणकाम व क्रेशरमुळे शेतीचे नुकसान, घरांना तडे, विहिरींच्या पाणीपातळीत घट, धूळ प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत. याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदने देऊनही ठोस कारवाई न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
उपोषणस्थळी झालेल्या बैठकीत आंदोलन अधिक तीव्र करण्याबाबत चर्चा झाली. ग्रामस्थांनी खाणकाम व ब्लास्टिंग तात्काळ बंद करणे, नुकसानीचे पंचनामे करून योग्य भरपाई देणे, संबंधित विभागांची संयुक्त चौकशी करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे या प्रमुख मागण्या पुन्हा मांडल्या.
यावेळी उपस्थितांनी प्रशासनाच्या उदासीन भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. “जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
वडझरी परिसरातील शेतकरी व नागरिकांच्या न्याय्य मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आता जोर धरत असून उपोषणाला मिळणारा वाढता पाठिंबा प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

ज्ञानगंगा विशेष
“खाण व क्रेशरमुळे बाधित शेतकरी आणि ग्रामस्थांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या लढ्याला दिवसेंदिवस बळ मिळत असून प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.”
साप्ताहिक ज्ञानगंगा
संपादक : शरद गोर्डे पाटील (बी.जे., पुणे)
🌐 www.Dnyangangaa.com
