प्रकल्पग्रस्तांना न्याय्य मोबदला व पारदर्शकतेच्या सूचना
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

अहिल्यानगर | प्रतिनिधी
सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखून शेतकरी व प्रकल्पग्रस्त नागरिकांना न्याय्य मोबदला वेळेत मिळावा, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने कार्य करावे, अशा सूचना पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीत जमीन संपादन करताना संबंधित जमिनीवरील झाडे, विहिरी, पाईपलाईन तसेच इतर मालमत्तांचे अचूक मूल्यांकन शासनाच्या निश्चित कार्यपद्धतीनुसार करण्यात यावे, मूल्यांकन प्रक्रियेत कोणतीही तफावत राहू नये तसेच शासनाच्या नियमांमध्ये कोणताही बदल होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. मोबदला वितरण प्रक्रिया पारदर्शक व वेळेत पूर्ण करण्यावरही भर देण्यात आला.
महामार्गासाठी आवश्यक असलेल्या उर्वरित जमिनीचे भूसंपादन तातडीने पूर्ण करून प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग हा वाहतूक, उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून या महामार्गामुळे परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्पाशी संबंधित सर्व कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. प्रशासनाने प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन संवेदनशीलतेने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पाचही तालुक्यांतील उपविभागीय अधिकाऱ्यांकडून तालुकानिहाय माहिती घेऊन प्रलंबित विषय तातडीने निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या बैठकीस जिल्हाधिकारी श्री. पंकज आशिया, उपविभागीय अधिकारी श्री. नितीन पाटील, श्री. माणिक आहेर, श्री. अरुण उंडे, श्री. किरण सावंत-पाटील, विशेष भूसंपादन अधिकारी श्री. अतुल चोरमारे, श्रीमती सायली सोळंके, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक श्री. मिलिंदकुमार वाबळे, व्यवस्थापक श्री. सत्यम राय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सुधाकर बोराळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पंकज आशिया यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती देताना सांगितले की, अहिल्यानगर, संगमनेर, राहुरी, राहाता आणि जामखेड या पाच तालुक्यांतील ६५ गावांमधून हा महामार्ग जात असून जिल्ह्यातील महामार्गाची एकूण लांबी १३९.५१ किलोमीटर आहे. तसेच १०४४ हेक्टर आर क्षेत्रापैकी ४११.९०८ हेक्टर आर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण झाले असून उर्वरित प्रक्रियेबाबत प्रशासनामार्फत कार्यवाही सुरू आहे.
