शिर्डीत उभारण्यात येणार ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुल; २३ मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

शिर्डीत उभारण्यात येणार ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुल; २३ मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

📍मुंबई / शिर्डी | प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनांना बळ देणारे ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुल शिर्डी औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आले असून, त्याचे उद्घाटन दि. २३ मे २०२६ रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

या पार्श्वभूमीवर निबे उद्योग समूहाचे प्रमुख गणेश निबे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, शिर्डीत उभारण्यात येणारे डिफेन्स क्लस्टर हे भारतातील खासगी क्षेत्रातील संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. अत्याधुनिक संरक्षण व एरोस्पेस उत्पादन क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येत आहे.

या प्रकल्पात १५५ मिमी क्षमतेचे तोफगोळे तयार करण्यात येणार असून, दरवर्षी सुमारे ५ लाख तोफगोळ्यांचे उत्पादन करण्याची क्षमता निर्माण होणार आहे. या उत्पादनासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि कच्चा माल पूर्णतः स्वदेशी असणार असल्याने ‘मेक फॉर वर्ल्ड’ अभियानालाही चालना मिळणार आहे.

शिर्डी औद्योगिक क्षेत्रातील सुमारे २०० एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या या डिफेन्स क्लस्टरमध्ये ड्रोन उत्पादन, क्षेपणास्त्रांचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन प्रणाली आणि अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक परीक्षण सुविधा उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे सुमारे ३ हजार युवकांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे.

“शिर्डीची भूमी ही भक्ती आणि शक्तीचा अद्वितीय संगम आहे. एका बाजूला साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश, तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अहिल्यानगर जिल्हा संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे,” असेही गणेश निबे यांनी नमूद केले.

दरम्यान, २३ ते २४ मे दरम्यान शिर्डीत डिफेन्स एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून, देशातील प्रमुख संरक्षण कंपन्या आणि १०० हून अधिक एमएसएमई उद्योग त्यात सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनातून युवकांना संरक्षण क्षेत्रातील रोजगार व उद्योग संधींची माहिती मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *