
📍 संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील मिर्झापूर ते धांदरफळ खुर्द या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. सुमारे ६ कोटी ३० लाख रुपयांच्या निधीतून हा रस्ता विकसित केला जाणार असून, यामुळे परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. याचबरोबर वीजपुरवठा अधिक सुरळीत व सक्षम करण्यासाठी उभारण्यात आलेल्या वीज उपकेंद्राची क्षमता १० एमव्हीपर्यंत वाढविण्यात आली असून, त्या कामाचेही लोकार्पण करण्यात आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला भाजपाचे सरचिटणीस साहेबराव वलवे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांतून गती मिळाली. “साहेबराव वलवे हे परिसरातील जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे कार्यकर्ते असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे मिर्झापूर परिसरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देता आला,” असे त्यांनी नमूद केले.

निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याबाबत बोलताना, मिर्झापूर हद्दीत कालवा अधिक खोल असल्याने निर्माण झालेल्या पाणी समस्येसंदर्भात तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. तसेच निळवंडे उजव्या कालव्याच्या पीडीएन पद्धतीच्या कामास मंजुरी मिळाल्याची माहिती देत, सुरू असलेल्या आवर्तनातून परिसरातील चार तलाव भरून देण्यात आल्याचे ग्रामस्थांना सांगितले.
“सिंचन आणि पाणी व्यवस्थापनाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला अधिक बळ मिळणार असून, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल,” असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
