शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ६६ गरजू रुग्णांना पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीतून ₹१.७४ कोटींचे अर्थसाहाय्य

शिर्डी | प्रतिनिधी
विरोधकांकडून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी गेल्या दोन वर्षांत कोणतेही काम केले नसल्याचा अपप्रचार केला जात असताना, प्रत्यक्ष कामगिरीचे आकडे मात्र वेगळे चित्र दाखवत आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील गंभीर आजारांनी ग्रस्त ६६ गरजू रुग्णांना पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीतून तब्बल ₹१ कोटी ७४ लाख ७ हजार ५०० रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर करून देण्यात आले आहे.
या निधीमुळे अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना महागड्या उपचारांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयात उपचार घेत आहेत ते रुग्णालय पंतप्रधान सहायता निधीच्या मान्यताप्राप्त पॅनेलमध्ये असणे आवश्यक असल्याची माहिती खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली.

तालुकानिहाय लाभार्थ्यांमध्ये कोपरगाव – ९, नेवासा – १५, राहाता – ८, संगमनेर – १५, श्रीरामपूर – १८ आणि अकोले – १ रुग्णांचा समावेश असून, एकूण ६६ रुग्णांना ₹१,७४,०७,५०० इतके अर्थसाहाय्य मिळाले आहे.
याबाबत खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले, “गरजू रुग्णांना वेळेवर आर्थिक मदत मिळावी, हाच आमचा प्रयत्न आहे. जनतेची सेवा हेच आमचे ध्येय असून प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
अलीकडे खासदार वाकचौरे यांच्या कामाबाबत विरोधकांकडून टीका होत असली, तरी पंतप्रधान सहायता निधीतून मिळालेल्या या मोठ्या आर्थिक मदतीमुळे “खासदारांचे काम बोलतेय” अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.

