वडझरी बु. येथे अखंड हरिनाम सप्ताहाला भक्तिमय उत्साह; गावच्या एकीचे दर्शन, हजारो भाविकांची उपस्थिती

वडझरी बु. येथे अखंड हरिनाम सप्ताहाला भक्तिमय उत्साह; गावच्या एकीचे दर्शन, हजारो भाविकांची उपस्थिती

वडझरी बु., ता. संगमनेर (जि. अहिल्यानगर) : श्री हनुमान मंदिर, वडझरी बु. येथे समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला असून, संपूर्ण गाव हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे. गावातील सर्व समाजघटक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांचा उत्स्फूर्त सहभाग या सप्ताहाला लाभत असून, गावाच्या धार्मिक परंपरेबरोबरच सामाजिक ऐक्याचे हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकड आरती, गाथा भजन, हरिपाठ, हरिकीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन होत असून, राज्यातील नामवंत कीर्तनकारांच्या प्रभावी कीर्तनसेवेने भाविक मंत्रमुग्ध होत आहेत. ह.भ.प. शरद महाराज ढवळे, ह.भ.प. सुनीताताई कातोरे , ह.भ.प. विश्वनाथ महाराज नवले , ह.भ.प. भगीरथ महाराज काळे, आचार्य ह.भ.प. शुभम महाराज कांडेकर , ह.भ.प. कांचनताई जगताप, ह.भ.प. भिमराज महाराज वेताळ, ह.भ.प. बाळासाहेब महाराज रंजाळे तसेच समारोपाच्या दिवशी ह.भ.प. गणेश महाराज शास्त्री यांची कीर्तनसेवा भाविकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

कीर्तन सेवा सौजन्य म्हणून श्री सुनील कदम, श्री केशव कदम, श्री भाऊसाहेब धोंडीबा गोर्डे , श्री अनिल सिताराम गोर्डे , श्री ज्ञानेश्वर कारभारी गोर्डे , श्री लक्ष्मण गुंजाळ, श्री संदेष दिघे आणि श्री ज्ञानेश्वर सयराम जाधव यांनी उदार सहकार्य केले आहे.

सप्ताहानिमित्त सकाळच्या नाश्त्याची सेवा श्री राजेंद्र वेताळ, दररोजच्या चहापाण्याची सेवा श्री भगवान आनंद गोर्डे , पुष्पहाराची सेवा श्री अक्षय कदम, शुटिंग श्री रवींद्र गोर्डे यांनी स्वीकारली असून, श्री शिवाजी कांदळकर यांनीही विविध स्वरूपात विशेष सहकार्य केले आहे. एकादशी महाप्रसाद (पंगत) व श्री निवृत्तीनाथ महाराज दिंडी सेवेचे आयोजन श्री शरद ज्ञानदेव गोर्डे , श्री राजेंद्र गामाजी गोर्डे , श्री तुकाराम दादा वेताळ, ॲड. बाळासाहेब शिंदे, श्री रोहिदास शांताराम राऊत आणि श्री विजय भगवान गोर्डे यांनी केले असून, भाविकांसाठी फराळाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

संध्याकाळच्या महाप्रसाद (पंगत) सेवेची जबाबदारी शिवनेरी ग्रुप, तोरणगड ग्रुप, पन्हाळगड ग्रुप, राजगड ग्रुप, सिंहगड ग्रुप, प्रतापगड ग्रुप आणि रायगड ग्रुप यांनी स्वीकारली आहे. दररोज हजारो भाविकांना प्रेमाने व शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसाद दिला जात असून, या सेवेमध्ये युवक आणि महिलांचा उल्लेखनीय सहभाग दिसून येत आहे.

सप्ताहातील विशेष आकर्षण ठरणारा श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडत आहे. दिंडीचे गावात सर्वत्र फुलांच्या वर्षावाने, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि जयघोषात भव्य स्वागत करण्यात येत आहे. दिंडी दर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो वारकरी आणि भाविक उपस्थित राहत असून, संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघत आहे.

सप्ताहात मृदुंगाचार्य ह.भ.प. रोहित महाराज गुंजाळ, गायनाचार्य ह.भ.प. नंदू महाराज घुले आणि गायनाचार्य ह.भ.प. सोमनाथ महाराज दिघे यांच्या भजन व हरिनाम सेवेने वातावरण अधिक मंगलमय झाले आहे.

सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवशंभू मित्र मंडळ आणि योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज भजनी मंडळ, वडझरी बु. यांचे मोलाचे योगदान लाभत असून, सर्व स्वयंसेवक सेवाभावाने कार्यरत आहेत.

गावातील प्रत्येक कुटुंब या धार्मिक सोहळ्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सहभागी झाले आहे. जात, पंथ आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन ग्रामस्थांनी दाखविलेली एकजूट, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, तरुणांची सेवाभावी वृत्ती आणि भाविकांसाठी करण्यात आलेली उत्कृष्ट व्यवस्था यामुळे वडझरी बुद्रुक हे गाव आज पंचक्रोशीत धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकीचे आदर्श उदाहरण म्हणून ओळखले जात असून, अखंड हरिनाम सप्ताहामुळे गावाच्या लौकिकात आणखी भर पडत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *