तळेगाव उपकेंद्राची क्षमता १० MVA होणार; लोहारेहून नवी ३३ KV लाईन

संगमनेर, ता. १६ (प्रतिनिधी) — वडझरी बुद्रुक, तळेगाव व परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या महिनाभरापासून भेडसावणाऱ्या सततच्या वीज खंडित होण्याच्या प्रश्नाने अखेर महावितरणला जागे केले आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या तळेगाव कक्षाने लेखी पत्राद्वारे विविध मागण्यांवर उपाययोजना करण्याचे स्पष्ट केले. या लेखी आश्वासनानंतर शेतकरी नेते शरद गोर्डे यांनी दि. १७ रोजी प्रस्तावित रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा केली.
महिनाभर वीजेचा लपंडाव; शेतकरी झाले हैराण
वडझरी बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांचा गेल्या महिनाभरापासून शेतीपंपांच्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे अक्षरशः जीव मेटाकुटीला आला होता. रात्रीच्या वेळी वीज गायब होणे, सिंगल फेजवर मोटारी जळण्याचा धोका, वडझरी १ व वडझरी २ फीडरवर वारंवार ट्रिपिंग होणे, यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीचा अंधार आणि वीजेच्या लपंडावाशी झुंज द्यावी लागत होती.
वारंवार तक्रारी करूनही दखल नाही; संतापाचा उद्रेक
वीजपुरवठ्याबाबत तळेगाव उपकेंद्राकडे वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत महावितरणला थेट इशारा दिला.
१७ शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन; आंदोलनाचा इशारा
श्री. शरद ज्ञानदेव गोर्डे, एकनाथ कांदळकर, दामू राऊत, रोहिदास राऊत , राजु गोर्डे, गणेश बोडखे , अविनाश गायकवाड, पंडित वेताळ, नाना गोर्डे, तुकाराम वेताळ, बाबासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर सुपेकर, नाना गोर्डे, मंगेश सुपेकर, विकास गोर्डे, भाऊराव गोर्डे आदी १७ शेतकऱ्यांनी स्वाक्षरी केलेले निवेदन दि. १० रोजी महावितरणकडे सादर करण्यात आले होते.

शेतकऱ्यांच्या चार प्रमुख मागण्या; थेट उपाययोजनांची मागणी
निवेदनातून शेतकऱ्यांनी तळेगाव फीडरची तात्काळ पाहणी करून डीपीचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवावा, शेतीसाठी दिवसा आठ तास नियमित तीन फेज वीज द्यावी, सबस्टेशनवरील तक्रार व जाळी बंधार दुरुस्ती करावी तसेच सायंकाळी ६ ते ९ या काळात वीजपुरवठा सुरक्षित ठेवावा, अशा चार प्रमुख मागण्या केल्या होत्या.
महावितरणने मान्य केले ट्रिपिंगचे कारण; ‘ओव्हरलोड’चा मुद्दा पुढे
महावितरणच्या सहाय्यक अभियंता, तळेगाव कक्ष यांनी जा.क्र. स.अ./तळेगाव/गोप/तां/२६-२७/ अन्वये दिलेल्या लेखी उत्तरात फीडरवर क्षमतेपेक्षा जास्त भार आल्याने संरक्षण यंत्रणा कार्यान्वित होऊन फीडर ट्रिप होत असल्याचे स्पष्ट केले आहे. रोहित्र व वाहिन्यांच्या सुरक्षेसाठी ही यंत्रणा कार्यरत होत असल्याचे महावितरणने म्हटले आहे.
अनधिकृत जोडण्यांवर धडक मोहीम; भार शोधण्यासाठी तपासणी
अनधिकृत कृषी जोडण्या व अनधिकृत भार शोधण्यासाठी विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठ्यावर अतिरिक्त भार निर्माण होण्याचा प्रश्न तपासला जाणार आहे.
ढगाळ हवामानामुळे सोलर प्लांटचा परिणाम; दिवसा वाढतो भार
आजमपूर व परेगाव येथील सोलर प्लांट ढगाळ वातावरणामुळे पूर्ण क्षमतेने कार्यरत राहत नसल्याने दिवसा वीजभार वाढून फीडर ट्रिपिंग होत असल्याचे कारण महावितरणने दिले आहे.
लोहारेहून नवी ३३ KV लाईन; मोठ्या कामाला मंजुरी
शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे लोहारे येथील प्रस्तावित १३२ KV उपकेंद्रातून तळेगाव व चिंचोलीसाठी नवीन ३३ KV वाहिनी मंजूर करण्यात आली आहे. या कामामुळे भविष्यातील वीजपुरवठ्यावरील ताण कमी करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
तळेगाव उपकेंद्राची क्षमता १० MVA होणार
तळेगाव उपकेंद्राची सध्याची क्षमता वाढवून १० MVA करण्याचा प्रस्ताव महावितरणकडून पुढे नेण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील वाढता वीजभार हाताळण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
वडझरी १ व २ फीडरचा भार कमी करण्यासाठी हालचाली
वडझरी १ व वडझरी २ वाहिनीवरील वाढता भार कमी करण्यासाठी भार दुसऱ्या वाहिनीवर वळविण्याची तांत्रिक तपासणी सुरू असल्याचे महावितरणने लेखी उत्तरात नमूद केले आहे.
सायंकाळी ६ ते ९ वीजवापरावर निर्बंध; शेतकऱ्यांसमोर नवी अडचण
सायंकाळी ६ ते ९ या वेळेत कृषी फीडरवर SDT प्रणाली कार्यान्वित असते. ३० अँपिअरपेक्षा जास्त भार आल्यास फीडर ट्रिप होतो, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. या वेळेत सिंगल फेज मोटार, वेल्डिंग मशीन, मोठे हीटर, कॉम्प्रेसर आदी उपकरणांचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तक्रारीसाठी स्वतंत्र वही; आता थेट उपकेंद्रात नोंद
ग्राहकांच्या सोयीसाठी तळेगाव उपकेंद्रात स्वतंत्र तक्रार वही ठेवण्यात आली आहे. फ्यूज, फीडर ट्रिपिंग, कमी दाब आदी तक्रारी ग्राहकांनी थेट उपकेंद्रात नोंदवाव्यात व त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल, असे महावितरणने आश्वासन दिले आहे.
लेखी आश्वासनानंतर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती
महावितरणने पत्राद्वारे शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रस्तावित रास्ता रोको आंदोलन करू नये, असे आवाहन केले. या लेखी आश्वासनानंतर शरद गोर्डे व शेतकऱ्यांनी दि. १७ रोजीचे रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
आश्वासन पाळले नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा
दरम्यान, महावितरणने दिलेली आश्वासने केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरली पाहिजेत, अशी भूमिका शेतकरी नेते शरद गोर्डे यांनी घेतली आहे. संबंधित उपाययोजना वेळेत पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
