सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिर्डी, दि. २५ (उमाका) — संतपरंपरा, वारकरी संप्रदाय आणि अखंड हरिनाम संकीर्तनाची समृद्ध परंपरा लाभलेल्या सरला बेटाचा सर्वांगीण विकास करून महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकसित करण्यात येईल. सरला बेटावरील विकासकामे पूर्ण झाल्यानंतर हे ठिकाण राज्यातील भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा केंद्र ठरेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनानिमित्त आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विठ्ठल लंघे, आमदार अमोल खताळ, आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, महंत रामगिरी महाराज, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सरला बेटाच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून त्याअंतर्गत सभागृह, रस्ते, पूरसंरक्षण व्यवस्था, सौरऊर्जा यांसह विविध विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण करून भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे.

हरिनाम संकीर्तन समाजाला एकत्र आणणारी शक्ती

सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी सुरू केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या परंपरेचा गौरव करत मुख्यमंत्री म्हणाले, सरला बेटासारख्या पवित्र भूमीतून समाजाला विचार, संस्कार आणि प्रेरणा मिळते. हरिनाम संकीर्तनामुळे दुःखाचे हरण होते, मनातील ‘मी’पणा दूर होतो आणि जातीभेद विसरून सर्वजण एकत्र येतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेण्याची भावना निर्माण होते.

आजच्या बदलत्या जगात हरिनाम संकीर्तन समाजाला एकत्र आणणारे आणि जीवनाला सकारात्मक दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे. वारकरी परंपरा, गुरु परंपरा आणि हरिनामाच्या शक्तीमुळे भारताची सनातन संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरा अखंड राहिली आहे.

भारताची संस्कृती आणि सभ्यता जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असून हजारो वर्षांपासून या भूमीवर सनातन विचार, संस्कार आणि अध्यात्माची परंपरा सुरू आहे. अनेक आक्रमणे झाली, मात्र भारतीय विचार, संस्कार आणि श्रद्धा कोणीही नष्ट करू शकले नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोफत वीज देण्याचा निर्धार

हरिनाम सप्ताहात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी होत असल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी, वारकरी, शेतमजूर तसेच समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द पूर्ण करण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत.

आतापर्यंत साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली असून, ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उपक्रम सुरू आहे. दर पंधरा दिवसांनी नवीन पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून सध्या ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज उपलब्ध होत आहे. टप्प्याटप्प्याने १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात येईल. भविष्यात वर्षभर १२ तास मोफत वीज देण्याचा निर्धारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांची ५८ हजार कोटी रुपयांची थकीत वीजबिले माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

हरिनाम सप्ताह समाजाला एकत्र आणणारा आध्यात्मिक सोहळा – एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अखंड हरिनाम सप्ताह हा अलौकिक आध्यात्मिक सोहळा आहे. या भूमीला योगीराज गंगागिरी महाराजांच्या तपश्चर्येचा आणि आशीर्वादाचा स्पर्श लाभला आहे. महंत रामगिरी महाराजांच्या अमृतवाणीतून भक्तीचा अखंड प्रवाह सुरू आहे.

अखंड हरिनाम सप्ताह हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजाला एकत्र आणणारा, भक्ती आणि संस्कारांची ऊर्जा देणारा सोहळा आहे. गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली १७९ वर्षांची परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने पुढे सुरू आहे. या सप्ताहामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, प्रसन्नता आणि मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘गावची एकी तर देवाची कृपा नक्की’ याचा प्रत्यय या सप्ताहातून येतो. पंचक्रोशीतील नागरिकांचे ऐक्य आणि सामाजिक सलोखा या सोहळ्यातून दिसून येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

शेतकरी आणि महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांचा उल्लेख करताना त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगितले. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसोबत राज्य शासनाने नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. शासनाच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे, अशी शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

अखंड हरिनाम सप्ताह समाजाला दिशा देणारा – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, अखंड हरिनाम सप्ताह हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजाला एकत्र आणणारा, मनाला शांती देणारा आणि जीवनाला योग्य दिशा देणारा आध्यात्मिक सोहळा आहे.

सात दिवसांच्या नामस्मरणातून आणि महंत रामगिरी महाराजांच्या मधुर वाणीतून परस्परांमध्ये प्रेम, बंधुभाव वाढविण्याचा तसेच व्यसनमुक्त आणि बलशाली समाज घडविण्याचा संदेश मिळतो. महंत रामगिरी महाराज अध्यात्माचा वारसा पुढे नेत असून त्यांच्या आध्यात्मिक चळवळीचे समाजाला दिशा देण्याच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे.

अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून संतांचे विचार आणि संस्कार समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचत आहेत. या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरेचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासन आवश्यक ते सहकार्य करेल, अशी ग्वाही डॉ. विखे पाटील यांनी दिली.

‘वंदे मातरम्’ समूहगायनाबद्दल महंत रामगिरी महाराजांचा सन्मान

कार्यक्रमादरम्यान ‘वंदे मातरम्’ गीताचे समूहगायन केल्याबद्दल महंत रामगिरी महाराज यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यानंतर ‘सोनियाचा दिन आज उगवला’ या अभंगाच्या तालावर उपस्थित मान्यवरांनी फुगडी खेळत भक्तीमय वातावरणात सहभाग घेतला. यावेळी उपस्थित भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष केला.

सरला बेटावरील अखंड हरिनाम सप्ताहाच्या या सोहळ्यामुळे परिसरात भक्ती, अध्यात्म, सामाजिक एकोपा आणि संतपरंपरेचा जागर झाला. शासनाच्या विकासकामांना संतपरंपरेची जोड मिळाल्याने सरला बेट भविष्यात महाराष्ट्रातील महत्त्वाचे आध्यात्मिक आणि तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *