भूमिपूजन झाले, निवेदने दिली, ग्रामपंचायतीनेही मागणी केली; तरी तिगांव–वडझरी रस्त्याचा प्रश्न कायम

भूमिपूजन झाले, निवेदने दिली, ग्रामपंचायतीनेही मागणी केली; तरी तिगांव–वडझरी रस्त्याचा प्रश्न कायम

१ कोटींच्या रस्त्याचे काम नेमके कुठपर्यंत? ग्रामस्थांचा संतप्त सवाल

वडझरी बु. | प्रतिनिधी

तिगांव ते वडझरी बु. (डी.जी. मा. 269) या महत्त्वाच्या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अंदाजे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कामाचे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहात भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजन फलकावर राज्याचे वरिष्ठ मंत्री, खासदार, आमदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची नावे झळकली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये रस्ता लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती.

मात्र भूमिपूजनाला अनेक महिने उलटूनही रस्त्याचे संपूर्ण काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता या कामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामपंचायतीचे पत्रही आले समोर

या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. ग्रामपंचायत वडझरी बु. यांनी दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांना अधिकृत पत्र देऊन तिगांव–वडझरी बु. रस्त्याच्या उर्वरित कामासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली होती.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे. तसेच काही भागाला प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु रस्त्यावरील उर्वरित लांबीचे काम पूर्ण होणे आवश्यक असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे.

यामुळे रस्त्याचे संपूर्ण काम पूर्ण झाले नसल्याचे संकेत अधिकृत पत्रातूनही मिळत असल्याची चर्चा सुरू आहे.

श्री शरद गोर्डे यांसह ग्रामस्थांचे पालकमंत्री विखे पा साहेबाना चौकशी साठी निवेदन

दरम्यान, साप्ताहिक ज्ञानगंगाचे संपादक व सामाजिक कार्यकर्ते शरद गोर्डे यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत थेट मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, अहिल्यानगर जिल्हा यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात रस्त्याच्या कामाबाबत चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या

✅ मंजूर निधीचा संपूर्ण तपशील जाहीर करावा.

✅ प्रत्यक्षात किती काम पूर्ण झाले याचा अहवाल प्रसिद्ध करावा.

✅ अपूर्ण कामासाठी जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी.

✅ उर्वरित रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे.

✅ कामाच्या दर्जाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करावी.

“नारळ फुटला, फलक लागले; पण रस्ता कुठे?”

ग्रामस्थांचा आरोप आहे की, ज्या ठिकाणी भूमिपूजन झाले आणि विकासाच्या घोषणा करण्यात आल्या, त्या ठिकाणी आजही संपूर्ण रस्ता तयार झालेला दिसत नाही. त्यामुळे गावात उपरोधिक स्वरात चर्चा सुरू असून नागरिक विचारत आहेत—

“नारळ फुटला, फलक लागले, फोटोसेशन झाले; पण रस्ता नेमका कुठे गेला?”

प्रशासनाकडे ग्रामस्थांच्या नजरा

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन सादर झाल्यानंतर संबंधित विभागाकडून माहिती मागविण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र अधिकृत चौकशी अहवाल अद्याप समोर आलेला नसल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

तिगांव–वडझरी हा परिसरातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असल्याने रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण व्हावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

आता प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित लोकप्रतिनिधी या प्रश्नावर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.


✍️ शरद गोर्डे
संपादक – ज्ञानगंगा
संगमनेर
📞 9623416734 / 9370940491

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *