— पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
जिल्ह्यातील १४ शिक्षकांसह २ केंद्रप्रमुखांचा गौरव

शिर्डी, दि. ५ (उमाका) : प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक जीवनाचा पाया आहे. हा पाया भक्कम झाला तर भविष्यात देशासाठी सक्षम, सुजाण आणि आदर्श नागरिक घडविणे शक्य होईल. बदलत्या काळाचे वास्तव लक्षात घेऊन शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत तळागाळातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने प्रवरानगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात आयोजित शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १४ शिक्षक आणि २ केंद्रप्रमुखांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब मस्के, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुघे, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, गटशिक्षणाधिकारी विवेक गुंड यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.
पुस्तकी ज्ञानाबरोबर वास्तवाचे भान आवश्यक
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, शिक्षकांनी केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वास्तवाचा आधार घेत शिक्षण द्यावे. विशेषतः ग्रामीण व तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. आज खासगी शाळांमधील विद्यार्थी सरकारी शाळांकडे वळू लागले आहेत. सरकारी शाळांच्या गुणवत्तेवर वाढत असलेला हा विश्वास निश्चितच समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
मोबाईल, सोशल मीडियाच्या अतिवापरावर नियंत्रण गरजेचे
बदलत्या काळानुसार ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापराचे दुष्परिणामही समोर येत आहेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल व सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवण्यासाठी पालक, शिक्षक आणि शालेय प्रशासनाने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
शिक्षकांनीही शालेय वेळेत मोबाईलचा अनावश्यक वापर टाळावा. शिक्षकांचे आचरण विद्यार्थी अनुकरण करीत असल्याने शिक्षकांनी स्वतः मोबाईलचा वापर कमी केल्यास त्याचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम होईल, असेही पालकमंत्र्यांनी नमूद केले.
शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी
शिष्यवृत्ती परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. प्राथमिक शिक्षणाचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी शिक्षकांनी प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे. प्राथमिक स्तरावरच विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला तर भविष्यात सक्षम नागरिक घडण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गणित-विज्ञान प्रदर्शनातून संशोधनवृत्तीला चालना
शाळांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या गणित व विज्ञान प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होते. अशा प्रदर्शनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून पुढील संशोधनासाठी बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय प्रशासनाने आवश्यक ते सहकार्य व प्रोत्साहन द्यावे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पकता आणि संशोधनवृत्ती विकसित करण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
शाळांमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
शाळांमधील मूलभूत सुविधांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. प्रत्येक शाळेत १०० टक्के शौचालय सुविधा, डिजिटल बोर्ड, सुसज्ज वर्गखोल्या तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
नवोदय विद्यालयातील ५२ विद्यार्थ्यांची निवड अभिमानास्पद
टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयात निवड झालेले ५२ विद्यार्थी प्राथमिक शाळांमधून शिक्षण घेऊन आले आहेत, ही बाब अभिमानास्पद आहे. प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता या कामगिरीतून अधोरेखित होत असल्याचेही पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
पुरस्कारप्राप्त शिक्षक व केंद्रप्रमुख
जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये सुमन खतोडे (जि. प. नवलेवाडी, अकोले), दिपाली रेपाळ (जि. प. जाखुरी, संगमनेर), सुनील पोरे (जि. प. घोयेगाव, कोपरगाव), संदीप कोरडे (जि. प. गोरडे वस्ती, राहाता), स्वाती पटारे (जि. प. अशोक नगर, श्रीरामपूर), सुवर्ण कचरे (जि. प. कुक्कडवेढे, राहुरी), राहुल आठरे (जि. प. भालगाव, नेवासा), सुरेखा खाडे (जि. प. राजनी, पाथर्डी), अमोल पवार (जि. प. बावी, जामखेड), अमोल हुमे (जि. प. अंबिका नगर, कर्जत), शहाजी खराडे (जि. प. भानगाव, श्रीगोंदा), प्रवीण कुमार झावरे (जि. प. टाकळी ढोकेश्वर, पारनेर), मनोज काशीद (जि. प. खोसपुरी, अहिल्यानगर) आणि किशोर मिसाळ (जि. प. झिरपे वस्ती, शेवगाव) यांचा समावेश आहे.
तसेच केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव (धांदरफळ, संगमनेर) आणि केंद्रप्रमुख रामराव निकम (पाटोदा, जामखेड) यांचाही गौरव करण्यात आला.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यातून इतर शिक्षकांनी प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी योगदान द्यावे. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून ही जबाबदारी शिक्षकांनी प्रभावीपणे पार पाडावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
