
💥 बेकायदेशीर वाळू, मुरूम उपसा करणाऱ्यांना पाठीशी घालू नका
मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे प्रशासनाला कडक आदेश
लोणी (ता. राहाता) येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात राज्याचे जलसंपदा मंत्री नाम. राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेत प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला. “वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल,” असे ठाम आदेश त्यांनी दिले.

जनता दरबारात उपस्थित नागरिकांनी मुरूम,वाळू उपसा, अवैध वाहतूक, महसूल विभागाच्या निष्क्रियतेबाबत तक्रारी मांडल्या. काही ठिकाणी दिवसाढवळ्या नदीपात्रातून वाळू उपसा सुरू असून स्थानिक प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, “बेकायदेशीर मुरूम,वाळू उपसा हा केवळ महसूल चोरीचा प्रश्न नाही, तर पर्यावरण व भविष्यातील पाणीटंचाईचा गंभीर विषय आहे. अशा प्रकारांना अजिबात थारा दिला जाणार नाही.” माफियांवर तात्काळ गुन्हे दाखल करून वाहने जप्त करण्याचे तसेच दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. जनतेच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही न झाल्यास संबंधित विभागप्रमुखांना जबाबदार धरले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोणी येथील जनता दरबारात महसूल, पोलीस, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य आदी विभागांशी संबंधित अनेक समस्यांचा थेट निपटारा करण्यात आला. नागरिकांनी मंत्री विखे पाटील यांच्या स्पष्ट भूमिकेचे स्वागत केले असून प्रशासनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.
✍️ — ज्ञानगंगा प्रतिनिधी
