
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत e-KYC प्रक्रियेत झालेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी लाभार्थी महिलांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. महिला व बाल विकास विभागाने ६ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार पात्र लाभार्थींना ऑनलाईन e-KYC मध्ये एकदाच सुधारणा करण्याची संधी ३१ मार्च २०२६ पर्यंत उपलब्ध राहणार आहे.
योजनेअंतर्गत अनेक महिलांनी आधार प्रमाणीकरणाद्वारे e-KYC पूर्ण केले असले तरी काही अर्जांमध्ये कुटुंबीयांची माहिती, नोकरीसंदर्भातील तपशील किंवा चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्रुटी निर्माण झाल्या आहेत. परिणामी पडताळणी प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊन अनेक प्रकरणे प्रलंबित राहिली होती. या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेला हा निर्णय लाभार्थींसाठी दिलासा देणारा ठरतो.

तथापि, ही सुधारणा केवळ एकदाच करता येणार असल्याने लाभार्थींनी अर्जातील माहिती काळजीपूर्वक तपासून दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळण्यासाठी दिलेल्या मुदतीत आवश्यक सुधारणा पूर्ण करणे हीच काळाची गरज आहे. प्रशासनानेही या प्रक्रियेत लाभार्थींना योग्य मार्गदर्शन करून योजना अधिक प्रभावीपणे राबवावी, ही अपेक्षा व्यक्त होते.
