संगमनेर (वार्ताहर) : महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत भोजापूर प्रकल्पासाठी तब्बल ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भोजापूर संघर्ष समिती व लाभधारक शेतकरी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
भोजापूर परिसरातील शेतकरी दीर्घकाळापासून पाण्याअभावी त्रस्त होते. सिंचन प्रकल्पाची कामे रखडल्यामुळे पिकांचे उत्पादन घटत होते. या पार्श्वभूमीवर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकार मध्ये जलसंपदा मंत्री या नात्याने व महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.
या निधीमुळे प्रलंबित कामांना गती मिळणार असून शेतीसाठी आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे ऊस, सोयाबीन, कांदा तसेच इतर हंगामी पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन आर्थिक स्थैर्य लाभेल, असा विश्वास लाभधारक शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.
लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत. “भोजापूर प्रकल्पाला नवीन उर्जा मिळाली असून आमचे भविष्य सुरक्षित झाले आहे,” अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या. या निर्णयामुळे गेली 40 वर्षे वंचित वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द,कौठे कमळेश्वर, तिगाव,करुले, धनगर वाडा, तळेगाव, पारेगाव, सोनोशी नान्नज,काकडवाडी या गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे
महायुती सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेती व शेतकऱ्यांच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडणार आहे.
मागील वर्षी नवरात्र उत्सवात सोनोशी या गावात नामदार विखे पाटील साहेबांनी दिलेला शब्द आज खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जात आहे – राजेंद्र सानप- सरपंच -सोनोशी.