निळवंडेचे पाणी तळेगावच्या दिशेने रवाना,शेतकऱ्यांनी व्यक्त केला आनंद!

संगमनेर,दि.2 (प्रतिनीधी)-

    गेली अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेल्या तळेगाव आणि पंचक्रोशीतील गावांना निळवंडे धरणातील पाणी पोहोचल्याने लाभक्षेत्राातील शेतकऱ्यांना एैन दुष्काळाच्या परिस्थितीत दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना केलेल्या सुचनांनंतर कालव्यातील पाण्याचा प्रवाह तळेगावच्या दिशेने रवाना झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा करत जलपुजन केले.

निळवंडे कालव्यातून प्रथम चाचणी झाल्यानंतर आता दुसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले आहे. यापूर्वी पाण्याची झालेली गळती थांबविण्यात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आल्याने हे पाणी आता उजव्या कालव्यावरील शेवटच्या गावापर्यंत पोहोचावे यासाठी नियोजन करण्यात आले आहे. आज तळेगाव ते वडझरी दरम्यान सर्व गावांना हे पाणी पोहोचले आहे. उद्यापर्यंत चिंचोलीगुरवपर्यंत पाणी पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

    गेली अनेक वर्षे या भागातील शेतकऱ्यांना निळवंडेच्या पाण्याची प्रतिक्षा होती. यासाठी शेतकऱ्यांचा मोठा संघर्षही झाला. मात्र युती सरकार सत्तेत असताना मुख्यमंत्राी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जेष्ठनेते मधूकरराव पिचड यांच्या पुढाकाराने धरणाच्या मुखापाशी कालव्यांचे कामं सुरु झाल्यानंतर या कालव्यांच्या कामांना गती मिळाली. त्यामुळेच उजव्या कालव्याचे कामही  पुर्ण झाल्याने हे पाणी सर्व गांवाना मिळणे शक्य झाले. आता लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत पाणी जाण्याचा मार्ग निर्वेध झाल्याने  एैन दुष्काळी परिस्थितीत या पाण्याचा लाभ मिळाल्याचे समाधान शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

निळवंडे कालव्यातून दुसऱ्यांदा पाणी सोडण्यात आल्यानंतर कुठेही पाण्याचा अपव्यय होणार नाही. यााची दक्षता घेण्याचे आदेश पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनीही अतिशय संवेदनशीलपणे कालव्यातून पाण्याचे वहन निर्विघ्नपणे पूर्ण होण्यासाठी  काम सुरु ठेवले असून, आज तळेगाव आणि पंचक्रोशितील गावांत हे पाणी पोहोचल्याने गावातील ओढे, नाले, बंधारे भरुन घेण्यासाठी या पाण्याची मोठी मदत होईल. पाणी आल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी वाद्यं वाजवून जलपूजन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *