निळवंडे कालव्‍यातून सोडण्‍यात आलेले पाणी ही फक्‍त चाचणी होती,

आवर्तन नव्‍हते हे समजून न घेता या विषयाचे राजकीय भांडवल करुन, शेतक-यांची दिशाभूल करण्‍याचे काम आ.बाळासाहेब थोरात यांनी करु नये, वर्षानुवर्षे जे तुम्‍हाला जमले नाही ते युती सरकारने करुन दाखविले आहे. आता तरी राजकारण करुन शेतक-यांच्‍या जखमेवर मीठ चोळण्‍याचे काम करु नका अशी अपेक्षा लाभक्षेत्रातील शेतकरी शरद गोर्डे यांनी व्‍यक्‍त केली आहे.

या संदर्भात प्रसिध्‍दीस दिलेल्‍या पत्रकात गोर्डे यांनी म्‍हटले आहे की, वर्षानुवर्षे निळवंडे पाण्‍याच्‍या प्रतिक्षेत असलेल्‍या लाभक्षेत्रातील शेतक-यांना प्रथम पाण्‍याच्‍या चाचणीमुळे मोठे समाधान मिळाले आहे. पाणी आल्‍याचा आनंद शेतक-यांनी व्‍यक्‍त केला. आधिका-यांच्‍या  परिश्रमामुळे अवघ्‍या सात दिवसात पाण्‍याची ही चाचणी यशस्‍वी  झाल्‍याने संगमनेर, राहाता, कोपरगाव या लाभक्षेत्रातील तालुक्‍याना मोठा दिलासा मिळाला. चा-यांनाही पाणी पोहोचल्‍याने ही चाचणी यशस्‍वी झाली असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.

चाचणीसाठी सोडण्‍यात आलेले पाणी बंद केले म्‍हणून थोरातांनी या विषयाचे राजकीय भांडवल करण्‍याचे काहीच कारण नाही. कारण वर्षानुवर्षे तुम्‍हाला जे करता आले नाही ते युती सरकारने करुन दाखविले. झालेल्‍या निर्णयाला महत्‍व आहे. पाणी सोडले की, बंद केले यावर सुरु केलेले राजकारण ही आपली हतबलता दाखवून देणारी आहे. केवळ पाणी सोडण्‍याचे श्रेय मिळाले नाही म्‍हणून आपला थयथयाट सुरु आहे. त्‍यामुळेच जाणीवपुर्वक आपल्‍याकडून होत असलेली वक्‍तव्‍य ही अतिशय दुर्दैवी आहे.

गेली अनेक वर्षे आपण निळवंडे या विषयावरुनच आपली राजकीय पोळी भाजुन घेत आहात. अनेक आश्‍वासनं आपण दिली तरीही तळेगाव गट हा पाण्‍यापासून वंचितच राहीला. मागणी करुनही तळेगाव पाणी पुरवठा योजनेला आपण निळवंड्याचे पाणी देवू शकला नाहीत. शहरापर्यंत आलेली निळवंड्याची पाईपलाईन या पाणी योजनेपर्यंत जोडणे सहज शक्‍य होते पण तेही आपल्‍याला करता आले नाही. आता केवळ राजकारणासाठी पत्रकबाजी करुन, सवंग  लोकप्रियता मिळविण्‍याचा आपला केवीलवाणा प्रयत्‍न शेतक-यांच्‍या लक्षात आला असल्‍याचा टोला शरद गोर्डे यांनी पत्रकात लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *